अमरावती - जिल्ह्यातील कुऱ्हा हे गाव सध्या भीषण पाणीटंचाईने त्रस्त झाले आहे. हीच पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील जलप्रतिष्ठान संस्थेच्यावतीने भोगावती नदीपात्रात महाश्रमदानाचा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
कुऱ्हा गावातून वाहणारी भोगावती नदी ही झाडा झुडपांनी बुजलेली आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक ही नदीत होत नाही. त्यामुळे कुऱ्हा गावकरी व अमरावती येथील जलप्रतिष्ठान यांच्या सहयोगाने पाणी बचाव नदी बचाव या जनजागृतीसाठी रविवारी सायंकाळी गावात महारॅली काढण्यात आली तर, आज सकाळी भोगावती नदी साफ करण्यासाठी शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला.
या महाश्रमदानामध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. भोगावती नदीचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यात नदीतील गाळ काढणे, झाडे झुडपे काढणे इत्यादी कामे होणार आहेत.
असा उपक्रम राबवणारे अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा हे प्रथम गाव आहे. येथे सद्य भीषण पाणीटंचाई सुरु आहे. मागील एका महिन्यापासून जलप्रतिष्ठान गावात सर्व घरांना एक ड्रम पाणी मोफत वाटत आहे.
या गावात राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज झालेल्या या महाश्रमदानात महिलांची, तरूण-तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.