अमरावती : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात येणाऱ्या जळकापटाचे या गावात उमेश मोडक हा युवक नाल्यात वाहून गेला. उमेश आपल्या शेतातून काम करून घरी परतत होता. दरम्यान ओसंडून वाहणारा नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दुपारी दोनच्या सुमारास वाहून गेलेल्या उमेश मोडक याचा मृतदेह सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास हाती लागला. या घटनेमुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
माडु नदीत वाहून गेली महिला : जिल्ह्यातील दुसऱ्या एका घटनेत मोर्शी तालुक्यात येणाऱ्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील माडू नदीच्या पात्रात लक्ष्मी अजय उबणारे ही 37 वर्षीय महिला वाहून गेली. आज सकाळी ती कामानिमित्त घराबाहेर पडली असताना मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या माडु नदीच्या पात्रात तिचा पाय घसरल्याने ती नदीत वाहून गेली. तिचा मृतदेह बराच उशिराने नदीपात्रात वाहताना दिसल्यावर आकाश झोडगामाक या युवकाने नदीपात्रात उडी मारून मृतदेह नदीबाहेर काढला. वर्षी उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
चांदूरबाजार तालुक्यात युवक गेला वाहून : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. तालुक्यातील शिरजगाव बंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालगत असणाऱ्या नाल्यात नामदेव पारिसे हा 20 वर्षीय युवक वाहून गेला. त्याचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे.
प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा : अमरावती जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. येत्या 36 तासात जिल्ह्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे. संभाव्य स्थिती बघता नागरिकांनी सावधानी बाळगावी, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. नदी आणि नाल्याच्या काठी वसलेल्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीशी निपटण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी देखील केलेली आहे. नागरिकांनी नदीला आलेल्या पुरात पोहायला किंवा पूर बघायला जाऊ नये, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: