अमरावती - गांधीजींनी सेवाग्राम आश्रमात लावलेल्या वृक्षांची कलमे तयार करण्यात आली आहेत. त्या कलमांची राज्यातील सर्व हुतात्मा स्मारक स्थळांवर लागवड करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बुधवारी ते अमरावती येथे बोलत होते.
पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे नियोजन, पूर्व तायरीबाबत राज्याचे वित्त नियोजन याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
तापमानवाढ, पाणी टंचाई, आशा संकटांवर मात करण्यासाठी जंगल संवर्धन ही काळाची गरज आहे. यामुळे वृक्ष लागवडीचा उपक्रम शासकीय न राहता जनतेचा होणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या अभियानातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे. २७३ चौरस किलोमीटर परिसरात वननिर्मिती झाली आहे. वृक्ष लागवडीत महाराष्ट्र भारतात पहिल्या स्थानावर आहे. वन क्षेत्रातील जलसाठे ४३२ चौरस किलोमीटरने विस्तारले आहे. बांबू वाहतूक पर्वाणामुक्त केल्याने बांबू विकासाला चालना मिळाली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
अमरावती जिल्ह्यात १ कोटी ११ लाख ६८ हजार ९००, अकोला जिल्ह्यात ६२ लाख २९ हजार ५००, बुलडाणा जिल्ह्यात ८२ लाख ४० हजार १५०, वाशिम जिल्ह्यात ४३ लाख ३ हजार ५०० आणि यवतमाळ जिल्ह्यात १ कोटी ३७ लाख ११ हजार ८५० इतके वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार ४ कोटी ४१ लाख ९ हजार रोपटे उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत ३ कोटी २० लाख ५२ हजार ११६ खड्डे पूर्ण झाले आहेत. तसेच उर्वरीत काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
४ कोटी ३६ लाख ५३ हजार ९०० वृक्ष लागवडी उद्दिष्टापैकी वनविभागाकडून १ कोटी ६१ लाख ७४ हजार, ग्रामपंचायतींकडून १ कोटी २५ लाख ९५ हजार ९५०, सामाजिक वाणीकरणाद्वारे ८२ लाख आणि इतर विभागांकडून ६६ लाख ८३ हजार ९५० झाडे लावण्यात येणार आहेत. या मोहिमेचा कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ असा असेल. हरित सेनेचे १ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून ६० लाख उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. विभागातील सद्स्य नोंदणीच्या १२ लाख उद्दिष्टांपैकी ९ लाख ३८ हजार पूर्ण झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.