अमरावती- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिटनेस लेव्हल प्रचंड आहे. त्यांची काम करण्याची क्षमताही भरपूर आहे. आपल्या पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्र बळकटीकरणासाठी देशभर आता 'फिट इंडिया' मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे राष्ट्रीय क्रीडा शिबिराचे उद्घाटन होते. या प्रसंगी किरेन रिजिजू यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२० मध्ये भारताला शक्तिशाली राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहत आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. शक्तिशाली राष्ट्राचे नागरिक अशक्त नकोत ते बळकट आणि सशक्त असावेत. यासाठी फिट इंडिया मोहीम आपल्या सर्वांना यशस्वी करायची आहे.
मी अमरावतीत पहिल्यांदाच आलो आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ लद्दाख, जम्मू पासून माझ्या अरुणाचल प्रदेशसह नागालँड, मिझोराम, मणिपूर, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे असा संपूर्ण भारतात पसरली आहे. ही संस्था प्रेरणादायी संस्था आहे. येथील शिस्त, संस्कृती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. ब्रिटिश राजवटीत १९३६ साली बर्लिन ऑलिंपिकमध्ये श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रतिनिधित्व केल्याचे कळल्यावर फार अभिमान वाटला, असे किरेन रिजिजू म्हणाले.
२०२० मध्ये टोकियो ऑलिंपिकसाठी आमचे खेळाडू सज्ज होत आहेत. जपान ऑलिंपिकसाठी हवा तसा वेळ नसला तरी २०२४ साली पॅरिस आणि त्यानंतर २०२८ मध्ये लॉस अँजिलीसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये भारत मोठी कामगिरी बजावेल, अशी आशा असल्याचे रिजिजू म्हणाले.
या सोहळ्यात उत्कृष्ट खेळाडूंसह अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकविणारा अमरावतीचा बाल कलावंत श्रीनिवास पोखळे याचा किरन रिजिजू यांनी सत्कार केला. यावेळी जम्मूचे खासदार जुगलकिशोर शर्मा, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवी राणा, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आदी उपस्थित होते.