अमरावती - कोरोना महामारीला रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील समाजवर्गाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊनये यासाठी अमरावतीतील व्हिजन इंडेग्रीटी डेव्हलपमेंट असोशिएशन ही स्वयंसेवी संघटना काम करत आहे. त्यांनी शेऊर अँड स्माईल उमक्रमांतर्गत त्यांना मदत म्हणून जीवनावश्यक खाद्यसामुग्रीच्या किट्स वितरीत करण्याचे कार्य हाती घेतले आहे. गहु आटा, तांदुळ, तुरडाळ, मटकी, खाद्य तेल, मीठ, साखर, चहापत्ती, मिरची पावडर, हळद पावडर, बिस्कीट पुडा, कपडे धुण्याचा साबण, अंघोळीचा साबण आदी आठवडाभर पुरेल एवढ्या खाद्यसामुग्रीचा यात समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील आडनदी, धामणगाव गढी, बिहाली, अचलपुर, अंजनगाव सुर्जी, पथ्रोट, वडगाव, मोर्शी, येरला, खानापूर, उदखेड, चांदुर बाजार, रासेगाव या ग्रामीण भागात राहणाऱ्या नैराश्यग्रस्त, निराश्रित, अंध व अपंग बांधवांना शोधून त्यांना खाद्यसामुग्री किट्सचे वितरण करण्यात आले. त्यांच्या राहत्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वप्रथम सॅनिटाईझरने त्यांचे हाथ स्वच्छ करून किटस् वितरीत करण्यात आले. आणखी गरजवंतांपर्यंत पोहचुन त्यांना किट्स देण्याचे कार्य लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार आहे, असे विडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रितेशकुमार सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी गोरगरीबांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याविषयीचे आवाहन त्यांनी केले आहे.