अमरावती - कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या एका तरुणीचा स्वॅब घेण्याच्या निमित्ताने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रकार अमरावतीत समोर आला होता. यानंतर बडनेरा येथील ज्या कोविड चाचणी सेंटरमध्ये हा प्रकार घडला तेथे संतप्त जमावाने तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
अमरावती शहरातील एका मॉलमध्ये काम करणारी तरुणी ही तिच्यासोबत काम करणाऱ्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने ती बडनेरा येथील कोविड सेंटरला तपासणीसाठी आली होती. तिचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असताना कोविड सेंटरचा टेक्निशियन अल्पेश देशमुख याने त्या तरुणीला तू पॉझिटिव्ह असून तुझी आणखी एक चाचणी करायची आहे, यासाठी तुझी लघवी तपासावी लागेल, असे सांगितले. यानंतर तरुणी एका महिलेसह कोविड सेंटरला आली होती. यावेळी अल्पेशने त्या तरुणीला एक खोलीत नेले आणि गुप्तांगातून स्वॅब घेण्याच्या नावाखाली तिच्याशी अश्लील प्रकार केला.
सदर तरुणीने या प्रकाराची माहिती तिच्या भावाला सांगितले. स्वॅब असा घेतला जात नाही, असे त्या तिला कळताच ती हादरली. यानंतर मंगळवारी रात्री सदर तरुणीने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अल्पेश देशमुख याला अटक केली.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असताना गुरुवारी दुपारी संतप्त जमावाने बडनेरा येथील कोविड सेंटरवर हल्ला केला. यावेळी या सेंटरमध्ये तीन कोरोनाग्रस्त दाखल होते. त्या तिघांनाही तातडीने अमरावती येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. हा हल्ला होताच या सेंटरवर स्वॅब देण्यासाठी आलेल्या लोकांनी पळ काढला. तसेच सेंटरवर कार्यरत डॉक्टर, टेक्निशियन पळून गेले आहेत. जमावाने सेंटरमधील सर्व साहित्य फोडून टाकले. या सेंटरच्या आत सर्वत्र काचांचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस कोविड सेंटरवर पोहोचले. दरम्यान, या कोविड सेंटरवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणावरही कारवाई केली नाही.
हेही वाचा : संतापजनक! अमरावतीत तरुणीच्या गुप्तांगाचा घेतला स्वॅब, कोरोनाबाधिताच्या आली होती संपर्कात