यवतमाळ - शहरातील वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालयात अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार यांच्या कक्षातच कार्यालयीन अधीक्षक गणेश उत्तरवार यांना शिवसेनेच्या संतोष ढवळे यांनी मारहाण केली. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध करित रुग्णसेवा बंद पाडली. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली होती.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी शेतकरी मोर्चावरुन 'आप'च्या धनंजय शिंदेंवर केला गुन्हा दाखल
रुग्णालय प्रशासनाकडून संतोष ढवळे यांच्या विरोधात यवतमाळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुग्णाला रक्ताची गरज असल्याने संतोष ढवळे हे ओपीडीच्या वरच्या मजल्यावरील रक्त पेढीत पोहोचले. त्यानंतर डॉक्टरांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. घटनेनंतर तेथील हजर डॉक्टर व डॉक्टरांच्या संघटनेने रुग्णालयात कामबंद आंदोलन पुकारले.
ढवळे यांच्यावर जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत रुग्णालयातील सेवा सुरळीत करणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. यानंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायंकाळपर्यंत ढवळे यांच्याविरुद्ध पोलिसांकडून कार्यवाही सुरू होती. डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
हेही वाचा - शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड; चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश