अमरावती - मेळघाटातील 'दहेंडा' हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात गाजावाजा करीत दोन वर्षांपूर्वी 2 लाख 60 हजार रुपये खर्च करून बोअरवेल खोदून गावभर पाईप लाईन टाकण्यात आली होती. मात्र, गावात आजवर पाणीच मिळाले नसल्याने हे सारे काही केवळ शोभेसाठीच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गावकऱ्यांना दुषित पाणी पिल्याने अतिसाराची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दहेंडा गावापासून 1 किमी अंतरावर घोगरा नाल्याच्या काठावर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे. शिवाय गावात दोन विहिरी आणि एक हात पंप आहे. या सर्व पाण्याच्या स्रोतात नाल्याचे घाण पाणी शिरत असल्याने 2 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने 2 लाख 60 हजार रुपयांच्या निधीतून बोअरवेल खोदून गावात पाईपलाईन टाकली होती. हे सर्व काम अगदी झपाट्याने करण्यात आले. मात्र, बोअरवेलच्या ठिकाणी विद्युत पुरवठा हवा असतो, याचे भान ग्रामसेवकाला नसल्याने दोन वर्षांपासून गावातील बोअरवेल केवळ शोभेची वस्तू ठरली आहे.
ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे गावात शुद्ध पाण्याची व्यवस्था असताना ग्रामस्थांना नाल्याचे पाणी पिण्याची वेळ आली. त्यामुळे गावकऱ्यांना अतिसारची लागण झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे.