अमरावती- राज्यात अनलॉक ५ मध्ये मंदिरे बंदच असल्याने ते सुरू व्हावे यासाठी भाजपकडून राज्यभरातील प्रमुख मंदिरांसमोर आज आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात 'दार उघड उद्धवा, दार उघड' अशा घोषणा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
राज्यातील सर्व मंदिरे सुरू करावी, ही मागणी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह आदी हिंदुत्ववादी संघटनांनी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली आहे. राज्यात अनलॉक ५ मध्ये सुद्धा मंदिर उघडन्याचा निर्णय झाला नसल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. त्यामुळे, आज भाजपचे राज्यभरातील मंदिरांसमोर एकदिवसीय आंदोलन सुरू आहे. अमरावती मधील गुरुकुंज मोझरी येथेही तुकडोजी महाराज यांच्या समाधी समोर भाजप, विश्व हिंदू परिषद आदींनी आंदोलन केले.
मंदिर बंद असल्यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या भूमीमध्ये आज आम्ही आंदोलन करत आहे, ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा जगभरात ग्रामगीतेच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. मंदिर उघडे असते तर आज तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली देण्यासाठी देशविदेशातून लाखो गुरुदेव भक्त आले असते. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रसंतांच्या भूमीत नीरव शांतता पसरलेली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राज्यभरातील सर्व मंदिरे उघडी करावी, अशी मागणी भाजपाच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता दिघडे (चौधरी) यांनी केली.