अमरावती- दर्यापूर येथील सामान्य कुटुंबातील मयूर कदम याने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळवले आहेत. त्याने ५०० पैकी ४९५ गुण मिळवत ९९ टक्के प्राप्त केले आहेत. मयूर हा प्रबोधन विद्यालयाचा विद्यार्थी आहे.
मयूरचे वडील जिल्हा बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. घरच्या जेमतेम परिस्थितीवर मात करत त्याने हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस अधिकारी होण्याचा मयूरचा मानस आहे. यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील, आजोबा आणि नातलगांचे असल्याचे मयूरने सांगितले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गणोरकर, प्राचार्य मेघा धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केल्याचेही त्याने सांगितले.
पहाटे चार वाजता उठून अभ्यास करण्यावर मयूरने भर दिला. मोबाईल आणि समाज माध्यमांपासून अंतरावर राहिलेल्या मयूरने कठोर परिश्रमाने हे यश मिळवले आहे. शाळेमध्ये शिकविलेल्या अभ्यासाची वारंवार उजळणी केल्याने आपण हे यश मिळाल्याचे मयूरने सांगितले.