अमरावती - राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या असून आता अनेक गावांत सरपंच विराजमान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातही ५३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून सरपंचांनी पदभार स्वीकारले आहेत. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी गावांतील सरपंच-उपसरपंच या दोन्ही महिलाच्या जोडीने नवा एक धाडसी निर्णय घेऊन कमालीचा उपक्रम सुरू केला आहे आणि तो उपक्रम आहे सक्तीच्या कर वसुलीचा. पाच दहा वर्षे नव्हे तर १७ वर्षांपासून ज्या ग्रामस्थांकडे कर थकला आहे, त्यांचाही कर आता वसूल केला जातोय. कारण या दोन्ही महिलांना आपलं गाव आदर्श करायचं आहे. त्यांच्या गावाला एका उंचीवर नेण्याचं कार्य करायचं आहे. त्यासाठी सरपंच विजया चवाळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारताच 'घर कर भरा, गाव समृद्ध करा' हे अभियान सुरू केलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे हे छोटसं गाव या गावातील ग्रामस्थांकडे गेल्या अनेक वर्षांपासून लाखो रुपयांचा घरपट्टी कर पाणीपट्टी कर थकीत आहे. त्यामुळे गावाचा विकास थांबला आहे. गावाचा विकास करायचा असला तर प्रत्येकाने घरपट्टी, पाणीपट्टी कर भरणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व ग्रामस्थांच्या नकारार्थी पणामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो गावांतील ग्रामस्थांवर लाखो रुपयांचा टॅक्स हा बाकी आहे. दरम्यान गावाची परिस्थिती बदलायची असेल गावाला आदर्श करायचं असेल तर घर टॅक्स जमा केलाच पाहिजे, हा निर्धार डोळ्यासमोर ठेवून नवनिर्वाचित सरपंच विजया चवाळे व उपसरपंच सोनाली दांडगे या महिलांनी पदभार स्वीकारताच गावात घर टॅक्स वसूल करण्याची मोहीम सुरू केली.
हेही वाचा - अमरावतीत लॉकडाऊन शिथिल; सर्व दुकाने उघडली, भीती मात्र कायम
हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करा - आमदार देवेंद्र भुयार