अमरावती - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती, मात्र आज पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 554 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने जिल्ह्यत खळबळ उडाली आहे.
कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू
बुधवारी कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये शहरातील एकविरा कॉलनी येथील 56 वर्षीय पुरुष, विलास नगर येथील 56 वर्षीय पुरुष, अक्षय कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, चिखलदरा येथील 75 वर्षीय पुरुष, आचालपूरच्या विलायतनगर परिसरातील 45 वर्षीय पुरुष, चांदुर बाजार तालुक्यातील तुळजापूर गाडी येथील 41 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 578 जणांचा मृत्यू झाला आहे.
जेष्ठ नागरिकांना लसीकरणाचे आवाहन
जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे, कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा जेष्ठ नागरिकांना असतो, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. अमरावतीमध्ये 22 फेब्रुवारीपासून सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली होती, मात्र आता हा वेळ वाढवण्यात आला आहे. आता सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत लॉकडाऊनमधून सूट असणार आहे.