अमरावती - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशी दारूचे दुकान, बार, वाईन शॉप बंद असल्याने याचा फटका तळीरामांनाही बसत आहे. परंतु, आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे अवैध दारू विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवत चक्क स्वंयपाक खोलीत खोल खड्डा खोदून देशी दारूच्या बाटल्या लपविल्या.
याची माहिती वरूड पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकून ११८३ बाटल्या देशी दारू, ८० लिटर गावठी दारू, असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलीस दिसताच आरोपी शक्तीसिंग नगीनासिंग भावे (वय ४५) व गगनसिंग धूमालसिंग पटवा (वय ५०) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
लॉकडाऊनमुळे वरूडमधील सर्व वाईन शॉप बंद केले असतानाही शहरामध्ये अवैध दारूचा महापूर आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत होते. या संपूर्ण अवैध दारू विक्रेत्यांवर रंगेहाथ कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी खबऱ्यांना कामाला लावून शहरात होत असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांची माहिती गोळा केली. त्यानुसार आज सकाळी ठाणेदार मगण वणा मेहते यांनी सापळा रचून ११.३०च्या दरम्यान शहरातील आठवडी बाजार परिसरालगत असलेल्या शिख वस्त्यामध्ये छापा सत्र राबवले.