अमरावती : पीएम मित्रा मेघा टेक्सटाईल पार्क अमरावतीत साकारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या टेक्स्टाईल पार्क साठी राज्य शासनाच्या वतीने 100 कोटी, केंद्र शासनाच्या वतीने शंभर कोटी असे 200 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अमरावती टेक्स्टाईल पार्कचा आढावा घेतला आहे. टेक्सटाईल पार्क निर्माणला गती मिळेल असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. टेक्स्टाईल पार्क संदर्भात उदय सामंत यांनी आज जागेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
411.2 हेक्टर जागेत पीएम मित्रा पार्क : अमरावती शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रामध्ये 2807 हेक्टर जागा टेक्स्टाईल पाच साठी संपादित करण्यात आली आहे. 2807 हेक्टर पैकी 176.80 हेक्टर वर टेक्स्टाईल पार्क विकसित करण्यात आले आहे. टेक्सटाईल पार्कसाठी पाणी वीज संपर्क रस्ते पथदिवे सांडपाणी संकलन यंत्रणा आणि पाच एम एल डी क्षमतेचे कॉमन एन फ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट यासारख्या सर्व पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त अमरावती परिसराच्या ब्राऊनफिल्ड पार्क श्रेणीत समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे अतिरिक्त अमरावती मधील विद्यमान टेक्स्टाईल पार्कला लागून असलेले चारशे अकरा पॉईंट दोन हेक्टर क्षेत्र पीएम पार्कसाठी प्रस्तावित आहे पीएम मित्रा पार्क प्रस्तावित 411.02 हेक्टर क्षेत्र सध्याच्या टेक्स्टाईल पार्कला लागून असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतल्या अडचणी : पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन आणि एप्रिल पार्क योजनेचा आढावा घेत असतानाच एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. अमरावतीच्या एमआयडीसीमध्ये वेस्ट वॉटर प्रक्रियेवर 255 रुपये दर लावण्यात आला आहे. हे दर उद्योजकांना परवडणारे नसल्यामुळे यामुळे या भागात उद्योग विकसित होणे कठीण असल्याच्या अडचणी एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतल्या. त्यांचे म्हणणे रास्त होते यामुळे वेस्ट वॉटर प्रक्रियेसाठी शंभर रुपयाच्या कमी रक्कम आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले. वीज दरात कपात मिळण्यासाठी टेक्स्टाईल पॉलिसी त्वरित जाहीर करावी अशी मागणी एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. शासन एक ते दीड महिन्यात टेक्स्टाईल पॉलिसी जाहीर करेल असे देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
तीस उद्योजकांची मुंबईत झाली बैठक : अमरावतीच्या टेक्सटाईल पार्क मध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी यावं यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार देशभरातील 30 मोठ्या उद्योजकांची बैठक नुकतीच मुंबईत घेतली. रेमंड देखील या परिसरात आपला प्रकल्प त विस्तार करण्याच्या विचारात आहे. या टेक्सटाईल पार्क चा रोड शो गुजरात तामिळनाडू आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये केला जाणार आहे आणि त्यानंतर अमरावती एमआयडीसी मध्ये या सर्व उद्योजकांना बोलावून हा पार्क किती सुविधा देणार आहे याची माहिती त्यांना दिली जाणार असल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले.
वर्षभरात अमरावतीतून झेपावणार विमान : अमरावती विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे मात्र सध्या विमानतळाचे काम अतिशय झपाट्याने सुरू आहे मी स्वतः विमानतळाची आज पाहणी केली. उत्कृष्ट दर्जाची धावपट्टी अमरावती विमानतळावर तयार झाली आहे. टर्मिनल च्या इमारतीचे काम आता चार ते सहा महिन्यात पूर्ण होईल. वर्षभरात अमरावती विमानतळावरून विमान झेप घेईल आणि याचा फायदा टेक्सटाईल पार्क मध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल असे उदय सामंत म्हणाले.
ज्यांनी जमीन दिली त्यांना मिळणार गाळा : ज्या शेतकऱ्यांनी टेक्सटाईल पार्क साठी आपल्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे त्यांचा योग्य मोबदला देण्यात आला आहे. असे असले तरी टेक्सटाईल पार्क विकसित झाल्यावर या ठिकाणी या शेतकऱ्यांना कुठल्याही टेंडर शिवाय शंभर ते दीडशे स्क्वेअर फुटाचा गाळा दिला जाईल. एमआयडीसीच्या विकासासाठी या शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना असा गाळा मिळणार असे देखील उदय सामंत यांनी जाहीर केले.
हेलिकॉप्टरमध्ये बसून पिकांचे नुकसान कळत नाही : आता अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला या संदर्भात आता हेलिकॉप्टर मधून मला आमदार रवी राणा यांनी या भागातील शेत दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंतर हेलिकॉप्टर मधून शेतीचे किती नुकसान झाले हे कळू शकत नाही. असे असले तरी मी या भागात शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले त्याचा आढावा घेण्यासंदर्भात संबंधितांना सांगेन असे देखील उदय सामंत यावेळी म्हणाले.