अमरावती- कालांतराने व्यक्तीची परिस्थिती बदलली की तो गावाला विसरून शहरात रमतो आणि गावाकडे दुर्लक्ष करतो. असे हजारो उदाहरण आपल्यासमोर असताना. मात्र, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील चेनुष्ठा गावातील आमले कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. हिवाळ्यात थंडी पासून रक्षण व्हावे तसेच, एक भेट वस्तू म्हणून मुलांच्या लग्नानिमित्त आमले कुटुंबाने त्यांच्या मुळ गावातील प्रत्येक घरी दोन ब्लँकेट व मिठाईचे वाटप करून गावकऱ्यांना मायेची ऊब दिली आहे.
तिवसा तालुक्यातील चेनुष्टा हे १५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. राजेंद्र आमले हे मूळचे चेनुष्ठा गावतील रहिवासी आहेत. परंतु कुटुंबातील सदस्य हे उच्च पदावर कार्यरत असल्याने व ते स्वतः देखील मोठे कंत्राटदार असल्याने ते सध्या नागपूरला राहतात. परंतु, गावातील लोकांशी असलेले सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध ते आजही जपतात. मुलाच्या लग्नाची कुठलीही कसर न ठेवता गावातील सर्वच लोकांना त्यांनी जेवणाची खास मेजवानी दिली. गावाशी असलेली नाळ ही आयुष्यभर टिकून राहावी हा त्यामागील उद्देश्य होता.
गावात असलेले ऋणानुबंध कायम राहावे यासाठी आमले कुटुंब गावात नेहमी सामाजिक कार्य राबवत असतात. तसेच गावात पर्यावरण पूरक वातावरण राहावे यासाठी त्यांच्या मुलाने आणि सुनेने गाव परिसरात झाडे लावली. यापुढे शेकडो झाडे गावात लावायचा मानसही आमले परिवाराचा आहे. आमले परिवाराने राबवलेले उपक्रम हे प्रेरणादायी व सामाजिक दायित्व जपणारे उपक्रम आहे. त्यांचे हा प्रयत्न शहर आणि गाव या दोन शब्दात असलेल्या अंतराला जवळ आणण्यासाठी नक्कीच फायदेचा ठरेल. माणूस कितीही मोठा झाला, श्रीमंत झाला, तरी त्याने आपल्या जन्मभूमीला विसरून जाता कामा नये, हाच संदेश आमले परिवाराने समाजाला दिला आहे.
हेही वाचा- अमरावती विद्यापीठातील २१ महाविद्यालयांचा भोंगळ कारभार..विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नाहीत ओळखपत्रे