अमरावती: शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी या ठिकाणी एकूण 52 जैन मंदिर आहेत. येथील अनेक मंदिरांची निर्मिती ही केव्हा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र काही मंदिरांची निर्मिती सोळाव्या शतकात झाली आहे. या सर्व मंदिरांमध्ये जैन तीर्थकारांच्या मूर्तींचे दर्शन घडते. 250 पायऱ्या चढून या सर्व मंदिरात असणाऱ्या जैन तीर्थकारांचे दर्शनासाठी भाविक येतात. एकूण 52 मंदिरांपैकी दहाव्या क्रमांकाचे मंदिर हे अतिप्राचीन असून ते अडीच हजार वर्षे जुने असावे, असा अंदाज आहे. हे मंदिर गुहेत असून या मंदिरात भगवान पंचपरमेशी या तीर्थकारांची ध्यानस्थ मूर्ती आहे.
राजा श्रीपाल यांच्या स्वप्नात मूर्ती : 26 क्रमांकाच्या मंदिरात मूलनायक भगवान पार्श्वनाथ यांची पद्मासनित काळा पाषाणातील चार फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती अचलपूर लगत एका सरोवरातून बाहेर काढण्यात आली होती. अचलपूर येथील राजा श्रीपाल यांच्या स्वप्नात ही मूर्ती आली होती. त्यांनी ती शहरालगतच्या सरोवरातून बाहेर काढून तिची स्थापना मुक्तागिरी येथील सोळाव्या क्रमांकाच्या मंदिरात केली. पार्श्वनाथ मंदिरात रोज सकाळी साडेआठ वाजता शाश्वत पूजा आणि पंचामृतांचा अभिषेक केला जातो. तसेच इंग्रजी शासन काळात मुक्तागिरी येथील मंदिरांची मालकी खापरडेनामक व्यक्तीकडे होती. घनदाट जंगलात असणाऱ्या या परिसरात त्याकाळी शिखरांनी धुमाकूळ घातला होता. त्यावेळी अचलपूर येथील जैन धर्माचे अनुयायी श्रीमंत नथूसा पासुला कळमकर यांनी संपूर्ण मुक्तागिरी पहाड आणि मंदिर 1928 मध्ये खापरणे यांच्याकडून विकत घेतले.
1960 मध्ये किमी भगवान महावीराची स्थापना: मुक्तागिरी या ठिकाणी अतिप्राचीन काळापासून जैन तीर्थकारांची मंदिरे आहेत. दत्तूचा पासुला कळमकर यांनी मुक्तागिरी येथील ही मंदिरे विकत घेतल्यावर 1960 मध्ये त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी भगवान महावीरांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुक्तागिरी येथील हे सर्व मंदिरांचा कारभार श्री दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र मुक्तागिरी या संस्थेच्यावतीने सांभाळला जातो. मुक्तागिरीला दरवर्षी जगभरातून पाच लाख भाविक भेट देतात. महावीर जयंतीच्या पर्वावर देखील अनेक भाविक मुक्तागिरीला येतात. यावर्षी महावीर जयंती ही सलग दोन दिवस साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार ही तिथी मागेपुढे आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी अशा दोन्ही दिवशी मुक्तागिरी येथे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे अतुल कळमकर यांनी सांगितले.
असा आहे मुक्तागिरी जाण्याचा मार्ग: सातपुडा पर्वतरांगेत वसलेले मुक्तागिरी हे ठिकाण मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात येणाऱ्या भैसदेही तालुक्यात आहे. मध्य प्रदेशातून मात्र मुक्तागिरीला जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. मुक्तागिरी हे जैन धर्मियांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. यासह निसर्ग सौंदर्याने भरलेल्या या परिसरात पावसाळ्यात सुंदर असा धबधबा डोंगरावरून कोसळतो. पावसाळ्यात लाखो पर्यटक मुक्तागिरीला भेट देतात.
हेही वाच: Mahavir Jayanti 2023 महावीर जयंती जाणून घ्या भगवान महावीरांची तत्त्वे आणि महत्त्व