अमरावती - जिल्ह्याचा आदिवासी भाग असलेल्या धारणी आणि चिखलधरा या तालुक्यातील तब्बल २४ गावे स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर आजही विजेवाचून अंधारातच आहेत. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज पुरवठा कऱण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सभागृहात धारणी आणि चिखलधरा तालुक्यातल्या गावात वीज पोहोचली नसल्याचे वास्तव मांडले. राणा म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर सभागृहात सांगणे हे सांगणे अत्यंत खेदाची बाब आहे, आमच्या मतदारसंघात जो आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो, यामध्ये धारणी आणि चिखलधरा या तालुक्यातील तब्बल २४ गावात आजही वीज आली नाही.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी विनंती करते की केंद्र सरकारने या गावांना वीज जोडणी देण्यासाठी विशेष योजना आखून त्यासंबधीचे आदेश द्यावेत,आणि त्या आदिवासींच्या जीवनातील अंधार दुर करावा अशी मागणी खासदार राणा यांनी यावेळी केली.
महिलांसाठी रुग्णालयांची मागणी -
धारणी आणि अचलपूरमध्ये एकलव्य शिक्षण संस्था आणि एक सैनिक स्कुल अमरावती जिल्ह्यासाठी द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रेल्वेलाईन ब्रॉडगेज करण्याची मागणीही राणा यांनी यावेळी केली. शकुंतला लाईन सुरू कऱण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. याच बरोबर अमरावती विभागात दोन सार्वजनिक रुग्णालये, २ सार्वजनिक आपत्कालीन ऑपरेशन सेटंर आणि एक मोबाईल रुग्णालयाची मागणीही त्यांनी यावेळी केली.