अमरावती - पावसाळ्याच्या तोंडावर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रोपांची लागवड केली जाते. अमरावती जिल्ह्यात एकूण 18 रोपवाटिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी लागणाऱ्या विविध प्रजातींच्या रोपांची निर्मिती जोमाने सुरू आहे. तिवसा वन परिक्षेत्रात येणाऱ्या शिवणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकाही सध्या लहान, मोठ्या वृक्षांच्या दीड लाख रोपांनी बहरली आहेत.
शिस्त, पापडा, पिंपळ, सीताफळ, करंज, कडुलिंब, जांभूळ, आवळा, चिंच, कवठ, वड, मोह, फणस, उंबर, अशा उंच वाढणाऱ्या वृक्षांची 50 हजार रोपे या रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत स्थनिक मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत डिसेंबर महिन्यापासून रोप निर्मितीला सुरुवात झाली होती. विविध प्रजातींच्या वृक्षांची ही रोपे सध्या 4 ते 5 फुटांपर्यंत वाढली आहेत. तसेच साग, शिवण, सेमल, कांचन, करंज, बांबू, शिसम, निंबू, पेरू, सीताफळ या वृक्षांचीही एकूण 1 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. जानेवारी महिन्यात या रोपांच्या निर्मितीला सुरुवात झाली असून ही रोपे 2 ते 3 फूटांपर्यंत वाढली असल्याची माहिती तिवसा वन परिक्षेत्र अधिकारी संतोष धापड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
शिवणगाव रोपवाटीकेतील 40 हजार रोपे ही शेतकऱ्यांच्या बांधावर लावण्यासाठी व शासकीय यंत्रणेला वृक्ष रोपणासाठी पुरवली जाणार आहेत. इतर रोपांची शासकीय दराने विक्री केली जाणार आहे. लहान झाडांचे 15 रुपये प्रति रोप तर मोठ्या झाडांचे रोप हे शासकीय दराप्रमाणे 75 रुपयाला विकले जाते.
सध्या 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान वन महोत्सव साजरा केला जात असल्याने 15 रुपयांचे रोप 8 रुपये व 75 रुपयांचे रोप हे 40 रुपये, असा सवलतीच्या दरात विकले जात आहे. या रोपवाटीकेतून रोपे खरेदीसाठी तालुक्याबाहेरूनही लोक येतात. महामार्गावरून जाणारे जिल्ह्याबाहेरचे वृक्षप्रेमी देखील येथे थांबून रोपांबाबत चौकशी करतात, असे संतोष धापड म्हणले.
या रोपवाटिकेत नियमित निंदणी, कीटकनाशकांची फवारणी, योग्य पाणी, रोपांना लागणारे टॉनिक, जीवांमृत असे उपयुक्त घटक वेळोवेळी दिले जात आहेत. विशेष म्हणजे या रोपवाटीकेतील प्रत्येक रोप हे कुठल्याही आधाराशिवाय सरळ वाढले आहेत. या रोपवाटीकेतील रोपे जंगलात कुठेही वाढण्यास अडचण येणार नाही, असा दावा संतोष धापड यांनी केला आहे.
रोपांची माहिती ऑनलाईन -
शिवणगाव येथील रोपवटीकेसह अमरावती जिल्ह्यातील सामाजिक वनीकारणाच्या सर्व 18 रोपवाटिकांची माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या रोपवाटिकांमध्ये किती आणि कोणती रोपे आहेत, कोणत्या दिवशी किती रोपांचे वाटप किंवा विक्री झाली याची माहितीही उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे रोपवाटिकेमध्ये रोपे लावण्याचे जे उद्दिष्ट दिले आहेत त्यात कुठलीही चालढकल न करता उद्दिष्टपूर्ती होते. याबाबत संबंधित सर्व जबाबदारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची असते, असे संतोष धापड म्हणाले.