अकोला - राज्यातील महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज मुंबई येथे काढण्यात आली. अकोला महापालिका महापौर पदाची सोडत ही महिला खुला प्रवर्गसाठी निघाली आहे. सध्या भाजपचे विजय अग्रवाल हे महापौर असून त्यांचा लवकरच कार्यकाळ संपणार आहे.
हेही वाचा- शिवसेनेसोबत चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत
सध्या 24 महिला नगरसेविका आहेत. त्यापैकी ज्या प्रबळ दावेदार होत्या त्यांना पक्षातर्फे विविध पदे देण्यात आले आहेत. परिणामी या पैकी कोणत्या नगरसेविकेची वर्णी लागणार आहे याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. मात्र, भाजपच्या मदतीसाठी नेहमी सक्रिय असणारे जयंत मसने यांच्या पत्नी नगरसेविका अर्चना मसने यांचे नाव महापौर पदासाठी आघाडीवर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अकोला महापालिकेमध्ये भाजप-सेना युतीची सत्ता आहे. या सत्तेमध्ये भाजपचे संख्याबळ जास्त असल्यामुळे खुला प्रवर्ग मधून विजय अग्रवाल यांची 9 मार्च 2017 रोजी महापौरपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून ते महापौर पदाचा कार्यकाळ सांभाळत आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबई येथे काढण्यात आली. त्यामध्ये महिला खुला प्रवर्ग, अशी आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे भाजपच्या कोणत्या महिला नगरसेविकांची महापौर पदासाठी वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेसाठी प्रमुख पक्षांकडून चढाओढ सुरू असतानाच अकोला महापालिकेतील महापौर पदासाठी आता भाजपच्या पक्षामध्ये नगरसेविकेची चांगलीच रस्सीखेच होणार आहे.