अकोला: कान्हेरी येथील कारखान्यात काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील मजुरांपैकी 28 वर्षीय अनिल शन्नीलाल उईके राहणार ब्रजपुरा तालुका जुन्नारदेव जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश आणि 25 वर्षीय पुष्पेंद्र कनस कुमरे राहणार पसलाई, जिल्हा बैतुल, मध्य प्रदेश हे दोघे मित्रांसोबत कान्हेरी ते एरंडा रोडवरील तलावात पोहण्यासाठी उतरले. पोहण्याच्या वेळी ते दुरवर पोहत गेले आणि तलावात अचानक बेपत्ता झाले. यावेळी त्यांच्या सोबतचे दोन्ही मित्र घाबरत पाण्यातून बाहेर आले आणि याबाबत कुटुंबीय आणि इतर लोकांना माहिती दिली.
या घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलिसांना मिळताच ठाणेदार सोळंके यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना घटनेबाबत अवगत केले. त्यानंतर दीपक सदाफळे हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी तलावात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी त्यांचे सहकारी ऋषिकेश राखोंडे, किशोर तायडे, विष्णु केवट, अंकुश सदाफळे, जितेंद्र केवट, आकाश बागाडे सुद्धा साहित्यासह घटनास्थळी पोहचले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे सुद्धा रेस्क्यू बोट घेवून घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकातील लोकांना बुडालेल्या युवकांच्या मित्रांनी युवक पोहताना बेपत्ता झाल्याचे ठिकाण दाखवले. परंतु त्यांना त्यांना काही दिसून आले नाही. त्यामुळे दीपक सदाफळे यांनी अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन राबविले. त्यानंतर दोन्ही मृतकांचे शव काढण्यासाठी संत गाडगे बाबा आपात्कालीन व शोध बचाव पथकाचे दीपक सदाफळे यांना कसोसिचे प्रयत्न केले. त्यानंतर दोन्ही मृतदेह खोल तलावातून बाहेर काढण्यात आले. अनिल शन्नीलाल उईके आणि पुष्पेंद्र कनस कुमरे या दोघांचा मृत्यु झाला.
दोन्ही युवकांचा मृतदेह शोधत असताना दीपक सदाफळे यांना तलावाच्या तळाशी एक मोठी विहीर असल्याचे लक्षात आले. विहिरीत अंदाजे १५ ते २० फुट खोल पाणी असल्याने दीपक सदाफळे यांनी विहिरीत जावून सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी तळाशी त्यांच्या हाताला मृतदेह लागला. सदर मृतदेहाला त्यांनी जमिनीवर आणले. त्यानंतर परत दुसरा मृतदेह शोधण्यासाठी ते तळाशी गेले. यावेळी दोन प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्यांना यश मिळाले नाही परंतु तिसऱ्या टप्प्यात त्यांनी दुसरा मृतदेह शोधून काढळा. दोन्ही मृतदेह पोलिस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.