अकोला - तेल्हारा तालुक्यातील आडसुळ फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक आज दुपारी पेटला. या आगीतून चालक व क्लिनर वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
तेल्हारा तालुक्यातील आडसुळ फाट्याजवळ पुठ्ठा घेऊन ट्रक चालला होता. धावत्या ट्रकने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यानंतर चालक व क्लिनर हे दोघेही ट्रकमधून बाहेर पडले. पाहता पाहता ट्रकमधील पुठ्ठा मोठ्या प्रमाणात जळू लागला. आगीचे लोण निघत होते. भररस्त्यात आग विझवावी कशी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, रस्त्याच्या कामासाठी आलेल्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली. आग लागलेली असताना दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. आगीचे लोण रस्त्याच्या बाजूने येत असल्याने कोणीही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. ट्रकची आग शांत झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती.
हेही वाचा - CORONA : संस्कृती संवर्धन समितीची गुढीपाडवा रॅली रद्द