अकोला - चोरीच्या गुन्ह्यात हवे असलेल्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीचे गुन्हे केले आहेत. या तिघांकडून चार लाख 35 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहम्मद उर्फ बबलू शेख अफसर, जावेद उल्ला खान उर्फ बिजली बरकत उल्ला खान, शेख जमिल उर्फ शेख सलीम अशी या तिघा चोरट्यांची नावे आहेत.
तिघे चोरटे संशयास्पदरित्या वाशिम बायपास रोडवरून गाडी क्रं. (एमएच 04 एफजे 8930)ने जात होते. त्यावेळी पोलिसांना शंका आल्याने गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून अनेक चोरीची गुन्हे समोर आले आहेत.
आठ गुन्ह्यात पोलिसांच्या रडारवर-
अकोला जिल्ह्यातील पातूर, बाळापूर, उरळ, मूर्तिजापूर या पोलीस ठाण्यातील एकूण चोरीच्या आठ गुन्ह्यात हे तिघे पोलिसांना हवे होते. पोलिसांनी या तिघांकडून चार लाख 35 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे, मो. रफी, अब्दुल माजिद, रवी ईरच्छे, अनिल राठोड, प्रवीण कश्यप, अविनाश मावळे यांनी केली.या तिघांना पुढील चौकशीसाठी बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.