अकोला - जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतींच्या प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावल्या. त्यातील दहा ग्रामपंचायती या अविरोध आहेत. चार लाख 63 हजार 247 मतदार 15 जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावित आहे. 60 निवडणूक निर्णय अधिकारी असून 4 हजार 411 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 852 पैकी 220 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
प्रशासन सज्ज
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींच्या प्रचाराचा जोर संपला. ग्रामविकास मुद्द्यावर उमेदवारांनी प्रचार केला. अनेकांनी सोशल मीडिया तर काहींनी डिजिटल पद्धतीने प्रचारात उडी घेतली. ग्रामीणमध्ये इतर राजकीय पक्षापेक्षा वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेची चांगली पकड आहे. त्यासोबतच राजकीय पक्षाचे समर्थन घेऊन अनेकांनी आपले पॅनल उभे केले आहेत. तसेच काहींनी या पॅनलला टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवारी घेऊन प्रचार केला आहे. तर गावातील अनेक राजकीय नेत्यांचे राजकारण या निवडणुकीवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील निवडणूक ही ग्रामविकासापेक्षा जातीच्या वजनावर ही चालत आहे. मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे.
कर्मचारी संशयित असेल तर करणार कोरोनाचाचणी
उमेदवारांची कोरोनाचाचणी करण्यात आली आहे. पण जे कर्मचारी हे ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी घेण्यात आले आहे, त्यांची चाचणी करण्यात आली नाही. बुथवर सॅनिटाइज, मास्क आणि हातमोजे हे कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.