अकोला - लोकसभा निवडणुकीसाठी महादेव कोळी समाजाचे राज्यात १० उमेदवार उभे राहिले आहेत. अकोला शहरातून कोळी महादेव समाजाचा उमेदवार म्हणून अरुण मनोहर ठाकरे यांनी आज जयहिंद क्रांती सेना या पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अकोला जिल्ह्यात आदिवासी महादेव कोळी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजाला आजपर्यंत निवडणुकीच्या काळात केवळ गृहीत धरले जात होते. मात्र, यावेळी ठाकरे हे निवडणूक लढवीत असून भाजप-शिवसेना, काँग्रेस आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठा फटका या निवडणुकीत बसणार असल्याची चिन्हे आहेत. या आदिवासी समाजाचे मत प्रत्येक वेळेस निर्णायक म्हणून समजले जाते.
अरुण ठाकरे हे एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी यापूर्वी पालघर या आदिवासी जिल्ह्यात एसटी कामगारांच्या संघटनेचे नेतृत्व केले आहे.