अकोला - या वर्षांतील प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचव्या सत्रांची परीक्षा होऊ न शकल्याने विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करावे. त्याच प्रमाणे विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात कोविड सेंटर तयार केले आहे. त्यामुळे वस्तीगृहात मागील चार ते पाच महिन्यांपासून विद्यार्थी नाहीत. म्हणून त्यांचे वस्तीगृह शुल्क देखील परत करावे या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) आंदोलन केले.
परीक्षेसाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षाशुल्क आकारले आहेत. मात्र. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. 2019-20 मधील प्रथम वर्षांतील प्रथम सत्र , द्वितीय वर्षातील तृतीय सत्र , तृतीय वर्षांतील पाचव्या सत्रांची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.
तसेच विद्यापीठातील मुलांचे वस्तीगृहात कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सत्रात 2019-20 वस्तीगृहात मागील चार ते पाच महिन्यांपासून विद्यार्थी वसतिगृहात नाहीत म्हणून त्यांचे वस्तीगृह शुल्क देखील परत करण्यात यावे, अशी मागणी सुद्धा केली आहे. कोरोनामुळे विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी आहेत. कोविड सेंटरमधील रुग्ण त्यांच्या वस्तूंची तोडफोड करत असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांनी केला. सात दिवसाच्या आत वरील दोन्ही मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.