अकोला - राज्यभरात कोविड लसीचा तुटवडा भासत आहे. याची झळ अकोला जिल्ह्यालाही बसत आहे. आरोग्य मंडळाच्या अकोला विभागासाठी फक्त 16 हजार 160 लसीचा साठा उपलब्ध आहे. दररोज अकोल्यात 20 हजार नागरिकांना लस दिल्या जात आहे. त्यामुळे मिळालेला साठा हा एकच दिवस पुरेल एवढा असून, विभागातील केवळ चार जिल्ह्यांसाठी हा साठा आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नाही.
लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या अकोल्यात 42 हजार 920 कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन 8 हजार 480 एवढा लसीचा साठा उपलब्ध आहे. हा साठा दोन दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. शासनाला पाच एप्रिल रोजी मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये 11 लाख 75 हजार कोविशील्ड तर कोव्हॅक्सीनचे डोस 6 लाख 60 हजार मागितली आहे. राज्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने 16 हजार 160 लसीचा साठा शासनाने पाठविला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हा साठा यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यात दिल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.