अकोला - विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान निकोबार या कारागृहातून बाहेर पडण्यासाठी इंग्रज सरकारसोबत करार केला होता. राजकारणात पडायचे नाही आणि रत्नागिरी जिल्हा सोडायचा नाही. हा करार केला नसता तर इंग्रज सरकारने त्यांना संपविले असते, अशी माहिती सावरकरांचे वंशज सात्यकी अशोक सावरकर यांनी दिली.
विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी निमित्त ब्राम्हण सभा, अकोला गुजराती समाज, अखिल भारती मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राम्हणसभा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला निकेश गुप्ता, अविनाश देव उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, रत्नागिरीमध्ये इंग्रजांनी त्यांना स्थानबद्ध केले होते. सावरकरांनी इंग्रज सरकारला दहा आवेदन पाठविली होती. त्यामध्ये ज्या लोकांना तुम्ही पकडले आहे, ज्यांच्यावर तुम्ही अत्याचार करीत आहेत, त्यांना सोडून मला पकडावे आणि माझ्यावर शिक्षा लावावी, असे त्यांनी म्हटले होते, असेही ते म्हणाले.
सावरकरांचे गुरु हे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे त्यांनी शत्रूंना शह देण्यासाठी ज्या पद्धतीचा उपयोग केला त्याच पद्धतीचा उपयोग सावरकरांनी केला असल्याचेही सात्यकीयांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे, सावरकरांवर आरोप करताना विचार करावा. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी अनेक रूढी-परंपरांवर बोट ठेवले होते, असेही सावरकरांचे वंशज सात्यकी अशोक सावरकर म्हणाले.