अकोला - संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला महानगरातून नववर्ष शोभायात्रा काढण्यात येते. गेल्या 12 ते 13 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या यात्रा, जत्रा, मिरवणुका, संमेलन, परिसंवाद असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू, नये असे आवाहन केले आहे. शासनाच्या आवाहनाला संस्कृती संवर्धन समितीने ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपल्या संस्कृतीचे संवर्धन करीत असताना या वर्षी एका अभिनव उपक्रमाने नवीन वर्ष साजरे करण्याचे ठरविले असल्याचे महेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जोशी म्हणाले, की यावर्षी आपल्यातील सर्व प्रमुख मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी त्या मंदिरामध्ये जाऊन मंदिराच्या कळसावर नवीन ध्वज लावण्यात येणार आहे. तसेच नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून आणि आपल्या घरावर गुढी उभारताना सोबत भगवे झेंडे लावत पारंपरिक पद्धतीने वेश परिधान करीत सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरस: अकोला जिल्ह्यातील 16 रुग्ण 'होम क्वॉरंटाईन'
नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता जनजागृती करावी, असे आवाहनही समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार हेडा, कार्याध्यक्ष हेमेंद्र राजगुरू, कार्याध्यक्ष इंद्रायणी देशमुख, संयोजक महेश जोशी, सहसंयोजक स्वानंद कोडोलीकर, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, दीपक मायी उपस्थित होते.