अकोला - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील याची कोरोनाची लागण होत आहे. अकोल्यामध्ये एका 55 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी गेल्या 8 दिवसांपासून आजारी रजेवर होता. या कर्मचाऱ्याला कोणापासून संसर्ग झाला? याचा तपास आता करण्यात येत आहे.
अकोल्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दीडशेच्यावर पोहोचली आहे. यामध्ये आतापर्यंत एकही पोलीस कर्मचारी हा कोरोनाबाधित नव्हता. परंतु, आज तपासणी अहवालामध्ये एक कर्मचारी हा कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. अकोल्यातील पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, हा कर्मचारी गेल्या 8 दिवसांपासून आजारी रजेवर होता. त्यामुळे आता प्रशासनाकडून त्याच्या घराचा परिसर सील करण्यात येणार आहे.
आतापर्यंत पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची एकदाही कोरोना तपासणी झाली नसल्याची माहिती आहे. हा कर्मचारी ज्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता. तेथील पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचीही आता तपासणी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.