अकोला - वन्यजीव विभागाच्या काटेपूर्णा अभयारण्यातील वाघा रोपवाटिकेत लॉकडाऊनच्या काळात हिरवीगार रोपवाटिका बहरली आहे. येथील मजुर सामाजिक अंतर राखत दिड लाख रोपांची काळजी घेत आहेत.
कोरोनामुळे वनमजूरांची वानवा असताना कडक उन्हाळात रोपवाटिका कशी वाचवायची? हा प्रश्न पडला होता. अशावेळी शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचे सदस्य, ग्रामस्थ व अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोज खैरनार यांनी या रोपवाटीकेची काळजी घेण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे कोरोनाच्या नियमावलीनुसार कामाचे नियोजन केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ जिल्हा वार्षिक योजनेतून काटेपूर्णा अभयारण्यात ज्या भागात झाडांची घनता कमी आहे. ती वाढविण्यासाठी या रोपवाटिकेची निर्मिती करण्यात आली.
या रोपवाटिकेत बिहाडा, आवळा, चिंच, बेल, निम, सिताफळ, अमलताश, हिरडा, काटेसावर, बोर, वड, पिंपळ, उंबर, कवठ, इंग्रजी चिंच व बांबूसह अनेक प्रजातींच्या रोपांचे संवर्धन करण्यात येत आहे. रोपवाटिकेतील रोपांची काळजी घेणे, पिशव्यांमधील तण काढणे, नियमित स्प्रिंल्कलरद्वारे पाणी देणे व छोट्या पिशव्यातील रोपे मोठ्या पिशवीत लावणे इत्यादी कामे या रोपवाटिकेतील १८ स्त्री व पुरूष सोशल डिस्टसिंग राखून व चेहर्यावर मास्क लावून करतात. यामधून त्यांना नियमित रोजगार प्राप्त झाला आहे.
पाणी देणारे जंगल अशी काटेपूर्णा अभयारण्याची ओळख झाली आहे. या अभयारण्यातील वन्यप्राण्यांना व पक्ष्यांना भविष्यात सावली व विविध फळे मिळावी, म्हणून हे वन कर्मचारी भर उन्हात व कोरोनाच्या संकटातही अखंडपणे राबतांना दिसत आहे. ही बाब प्रत्येकापुढे एक आदर्श निर्माण करणारी आहे.