अकोला - युनेस्कोच्या सिडनी येथील इको ट्रेनिंग सेंटरतर्फे जगभरातील निवडक उपक्रमशील तथा तंत्र स्नेही शिक्षकांना देण्यात येणारा मानाचा आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रभात किड्स स्कूलच्या शिक्षिका अलिफिया आलमदार यांना देण्यात आला. ऑनलाइन पध्दतीने पुरस्कार सोहळ्यात अलिफिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोविड-१९च्या संसर्ग कालावधीत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.
युनेस्को संघटनेद्वारे १९९४ पासून जागतिक शिक्षक दिन ५ आक्टोबर रोजी आयोजित करण्यात येतो. या विशेष दिवसाचे औचित्य साधून कोविड-१९च्या संसर्ग कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध देशातील तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विविध देशांतील निवडक शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान देण्यात आला. यामध्ये शहरातील प्रभात किड्स स्कुलच्या शिक्षिका अलिफिया आलमदार यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे समाजाच्या सर्वच स्तरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात असून शाळेचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ.वंदना नारे व सचिव निरज आंवडेकर, तज्ज्ञ संचालक कांचन पटोकार, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी तसेच शिक्षकवृदांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले आहे. दरम्यान, संपुर्ण देशातुन सहा तज्ज्ञ शिक्षकांची या पुरस्काराची निवड झाली असून प्रभातच्या अलिफिया आलमदार यांच्यासह पुणे, सोलापूर, अहमदनगर, पंजाब आणि दिल्ली येथील अन्य पाच शिक्षकांना गौरविण्यात आले आहे.