अकोला - माहिती अधिकारात माहिती दिली नाही म्हणून एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने जिल्हा परिषद प्रशासनाला आत्मदहन करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे पोलीस आणि अग्निशमन दल जिल्हा परिषदेत आज सकाळपासून ठाण मांडून होते. मात्र दुपारपर्यंत धमकी देणारा कार्यकर्ता न आल्याने, ही शासकीय यंत्रणा वेठीस धरली गेली.
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात संजय सुरवाडे यांनी माहिती मागितली होती. ही माहिती विभागाकडून न मिळाल्याने संजय सुरवाडे यांनी जिल्हा परिषदेला आत्मदहन करण्याचे पत्र दिले होते. यानुसार लघुसिंचन विभागाने अग्निशमन दल व सिटी कोतवाली पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार सुरवाडे यांनी दिलेल्या तारखेनुसार पोलिसांनी व अग्निशमन दलाने जिल्हा परिषदेच्या आवारात बंदोबस्त लावला. सकाळपासून हे दोन्ही विभाग जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय सुरवाडेला सकाळी खदान पोलिसांनी ताब्यात घेऊन आत्मदहन करणार नाही, असे लिहून दिले आहे. परंतु, ही माहिती जिल्हा परिषदेच्या आवारात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना नसल्याने ते सतर्क आहेत.