अकोला - बहुजन महासंघाचे संस्थापक तथा माजी मंत्री मखराम पवार यांचे मुंबई येथील लिलावती रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान रविवारी (दि. 8 ऑगस्ट) सकाळी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
मखराम पवार यांनी बहुजन महासंघ या सामाजिक संघटनेची स्थापन केली होती. त्यांनी या संघटनेपासून आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. पुढे 21 मार्च, 1993 ला शेगाव येथे निळू फुले, राम नगरकर यांच्या उपस्थितीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘भारिप’ आणि ‘बहुजन महासंघ’चे संयुक्त अधिवेशन झाले. या अधिवेशनात मखराम पवार यांनी त्यांची बहुजन महासंघ ही संघटना ‘भारिप’मध्ये विलीन केली. पुढे भारिपचा नामविस्तार ‘भारिप बहुजन महासंघ’, असा झाला. मखराम पवार हे भारिप बहुजन महासंघ या पक्षावरच पहिल्यांदा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1999 ते 2004 या कार्यकाळात विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भारिप बहुजन महासंघाच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद आले होते. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मखराम पवार यांची वर्णी लागली होती.
त्यानंतर भारिप बहुजन महासंघामधील अंतर्गत वादातून मखराम पवार यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडून आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर 2009 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि पुन्हा 2013 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यानच्या काळात अकोला जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मखराम पवार यांचा मुलगा सतिश मखराम पवार यांनी जांब वसू जि.प.सर्कल मधून भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. गेले काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांची प्राण ज्योत मालवली.
हेही वाचा - लग्नास नकार दिला म्हणून एनसीसी प्रशिक्षकाविरोधात विद्यार्थिनीची तक्रार