अकोला - अकोला महापालिका शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये 23 लाख 2 हजार 963 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार जिल्हा उपनिबंधक सहकार विभागातर्फे झालेल्या तपासणीत समोर आला आहे. त्यानुसार पतसंस्थेच्या 12 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या पतसंस्थेचे कॅनरा व ओरिएंटल बँकेचे खाते ही आज सील करण्यात आले आहे.
अकोला महापालिका शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने विविध कारणाद्वारे पतसंस्थेतून त्यांच्या नावे पैसे काढले. मात्र, त्यापैकी अनेक खर्चाचा हिशोब मिळून आला नाही. तसेच खर्च केल्याच्या पावत्या ही जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाने तपासणी केल्यानंतर मिळून आल्या नाहीत. हा प्रकार सन 2012 ते 2017 दरम्यानच्या लेखापरीक्षण अहवालात समोर आला आहे.
ही अनियमितता करणारे अध्यक्ष नरेश मूर्ती, उपाध्यक्ष शरद टाले, माजी सचिव नानाजी किनाके, सचिव किशोर सोनटक्के, संचालिका सुनिता चरकोलू, नासिहा तबसुम मो.हातीम, रागिनी घरडे, प्रकाश फुलउंबरकर, नितीन नागलकर, संगीतराव थोरात, गजेंद्र ढवळे व व्यवस्थापक निलेश गुहे यांचा समावेश आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर यामध्ये या पतसंस्थेचे कॅनरा व ओरिएंटल बँकेमध्ये असलेले खाते ही सील करण्यात आले आहे. या पतसंस्थेत अपहार हा चव्हाट्यावर आल्यामुळे मनपा कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.