अकोला - नागपूर येथे ऐनवेळी काँग्रेसने आपला उमेदवार बदलून भाजपला विजयाची संधी दिली आहे. त्याचप्रमाणे अकोल्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपला छुप्या पद्धतीने मदत करून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भामध्ये ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीने या प्रक्रियेत कोणालाही मदत केली नाही. पक्षाच्या मतदारांनी त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीने मतदान केले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक मानकर यांना आम्ही विचारणा केली होती. परंतु, त्यांनी पक्षाकडून कुठलाही आदेश आला नसल्याचे सांगितले होते. मात्र, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी काँग्रेसच्या मतदारांना भाजपकडे वळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचे मतदार भाजपला विजयी करण्यासाठी पाठविले होते. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने खेळी केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला एकटे पाडले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी केला आहे.
हे ही वाचा - MLC Election Result 2021 : नागपूरसह अकोल्यातही भाजपचा विजय, काँग्रेसची मतं फुटली
राज्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी छुपी युती केली आहे. त्याचा फटका शिवसेनेला भविष्यात बसेल आणि आताही बसला आहे, असा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला पक्षाचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते.