अकोला - खासगी आणि शासकीय रुग्णालयातून औषधांच्या वापरानंतर रिकाम्या बॉटल्स, सलाईन, इंजेक्शन, औषधी यांची विल्हेवाट लावण्यासाठी अकोला महापालिकेने अमरावती येथील एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. ही कंपनी दररोज जिल्ह्यातील खासगी डॉक्टर, रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहा ते सात टन बायोमेडिकल वेस्ट जमा करून अमरावतीला नेत आहे. त्यानंतर भस्मिकरण यंत्रामध्ये ते जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. कोरोना काळात तयार होणारे बायोमेडिकल वेस्ट हाताळण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडे कुठलेही सुरक्षेचे साधन नसताना देखील ते आपले कर्तव्य बजावत आहेत.
खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वापरलेल्या औषधांच्या बॉटल्स, सलाइन, इंजेक्शन यांची विल्हेवाट लावणे म्हणजे एक प्रकारे प्रदूषणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. या बायोमेडिकल वेस्टची योग्य रीत्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून अमरावती येथील एका खासगी कंपनीला अकोला महापालिकेनेच नव्हे तर पश्चिम वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्याने बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट दिले आहे. ही कंपनी पाचही जिल्ह्यातील खासगी रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेले बायोवेस्ट एकत्रित गोळा करते आणि त्याची अमरावती येथे असलेल्या भस्मिकरण यंत्रामध्ये विल्हेवाट लावते.
दररोज सहा ते सात टन बायोमेडिकलची वाहतूक
अकोला जिल्ह्यांमध्ये या कंपनीच्या माध्यमातून दररोज सहा ते सात टन बायोमेडिकल वेस्ट गोळा केल्या जातो. अकोला शहरातील खासगी रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बायोमेडिकल वेस्ट हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन केंद्राजवळ असलेल्या आणि बंद पडलेल्या भस्मिकरण केंद्रामध्ये एकत्रित करण्यात येतो. व त्यानंतर हा कचरा कंपनीच्या माध्यमातून अमरावतीला नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात येते.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
बायो मेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी अकोल्यामध्ये या कंपनीचे 14 कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचे वेतन अतिशय कमी असून, त्यांच्याकडे सुरक्षीततेचे कोणतेही साधन नाही. कोरोना केंद्रातून निघालेले बायोमेडिकल वेस्ट पीपीइ किट घालून ते एकत्रित करणे व त्याची वेगळी व्यवस्था करणे आवश्यक आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांना पीपीइ किट देखील पुरवण्यात येत नसून, ते पीपीइ किट न घालताच काम करत आहेत. अकोला महापालिका प्रशासन आरोग्य विभाग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षीत व्यवस्था आहे किंवा नाही याची पाहणी करत नसल्याने या कर्मचाऱ्यांची आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीने सुरक्षेची साधने पुरवावीत अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.