अकोला - पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज (गुरुवार) अकोला शहरातील विविध भागात जाऊन पाहणी केली. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी स्वतः मोटार सायकलवर स्वार होत शहराची पाहणी केली. अकोला शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडू यांनी यावेळी कारवाई केली. तसेच विनाकारण घराबाहेर दुचाकीवर फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील पालकमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले आणि त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली.
कंटेनमेंट झोनमधील नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून...
बच्चू कडू यांनी शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात पाहणी केली. यावेळी सदर भागातील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. शहरातील जे भाग कोरोनामुळे सील केले आहेत. त्या भागातील नागरिकांनी घराबाहेर निघू नये. त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा त्यांना तिथेच उपलब्ध होतील. या भागातील शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर नेण्याची आणि आणण्याची व्यवस्था केली जाईल. नागरिकांना रेशनचे धान्य, औषधे वेळेवर मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा... उत्तरप्रदेश: बिहारला पायी जाणाऱ्या मजूरांना बसने चिरडले, ६ जणांचा मृत्यू, ४ जखमी
अकोला शहरातील बैदपूरा, अकोट फाईल, माणेक टॉकीज परिसर आणि इतर ठिकाणची कडू यांनी पाहणी केली. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात समस्या मांडल्या. त्यासोबत कडू यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेबाबत माहिती घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले. शहर बसस्थानकावर गेल्यावर बच्चू कडूंनी तेलंगाणा येथे जाणाऱ्या प्रवाशांना जेवणाचे डबे दिले. तसेच या कामगारांच्या बसला हिरवा झेंडा दाखवला. नागरिकांनी घरातच राहावे, कोणीही विनाकारण घराबाहेर निघू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.