अहमदनगर- जिल्ह्यात रानडुकरे धुमाकुळ घालत आहेत. शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पससले आहे. त्यातच शेवगांव शहरात भडके मळ्यातील एका महिलेवर रानडुकराने हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- लॉकडाऊन : पालघरमधील नवदाम्पत्य लग्नाच्या बेडीत 'लॉक,' मुख्यमंत्री निधीत 10 हजारांची मदत
शेवगांव शहरातील नित्यसेवा रुग्णालयाच्या मागील बाजूस भडके मळ्यात रुपाली नांगरे ९ मे ला काम करीत होत्या. दरम्यान, अचानक रानडुकराने हल्ला केला. महिला बचावासाठी शहराच्या दिशेने पळाली. मात्र, रानडुक्कराने महिलेचा पाठलाग सोडला नाही. महिला लोकवस्तीत आल्यावर रानडुक्कर गायब झाले.
घटनेनंतर परिसरातील काही तरुण रानडुकराचा शोध घेत आहेत. या संदर्भात शेवगांव पाथर्डीच्या वनपाल यांना माहिती दिली. मात्र, असे प्राणी पकडण्यासाठी आमच्याकडे कुठलीही यंत्रणा नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित महिलेला घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सिव्हिल रुग्णालय हे कोविड रुग्णालय झाल्याने तिथे महिलेवर उपचार करण्यास डाॅक्टरांनी नकार दिला. त्यामुळे महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.