अहमदनगर - निसर्गाच्या कुशीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदऱ्याच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणाच्या काठाशी आदिवासी युवकांनी पर्यटकांसाठी टेंटची सुविधा केली आहे.
हेही वाचा - शिर्डी साईबाबांना १५ लाखांचा सुवर्णमंडित शंख अर्पण
अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेले प्रेक्षनिय ठिकाण समजले जाते. या भंडारदऱ्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले भंडारदरा हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल्समध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाई केली आहे. तर काही ठिकाणी आदिवासी बांधवांचे कामडनृत्य, टिपरी नृत्य ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची शिर्डीत गर्दी; मंदिर रात्रभर खुले राहणार
पर्यटकांना नवीन वर्षाचा साद घालता यावा, हा उद्देश समोर ठेऊन अनेक टेंटधारक तसेच हॉटेल्सची जय्यत तयारी करत आहेत. पर्यटकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदऱ्याचा आश्रय घ्यावा व आनंद द्विगुणीत करावा, म्हणून सोशल मीडियाचाही अनेक युवकांनी वापर केला आहे. या परिसरातील शांतता पर्यटकांना आकर्षित करत असून राज्यातील आणि परराज्यातील अनेक पर्यटक भंडारदऱ्याला आले आहेत.