अहमदनगर - संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील एक एकर जागेत असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला काल रात्री (मंगळवार) साडे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदामातील कापूस, गहू, सोयाबीन, मका, हरभरा यांचा मोठा साठा होता. रात्री लागलेली आग तब्बल बारा तास उलटूनही अद्याप आटोक्यात आलेली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत असून नुकसानीचा निश्चित अंदाज वर्तविण्यात आला नसला तरी वखार महामंडळाचे कनिष्ठ अधीक्षक गिरीश कुलकर्णी यांच्या माहितीनुसार सुमारे दोनशे कोटींचा माल या आगीत जाळून खाक झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, आदी सह शहरातील व्यापारी, नगरसेवक मोठ्या संख्येने बाजार समिती आवारात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात येत नसल्याने तातडीने प्रवरा नगर, राहता, राहुरी, आदी ठिकाणचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री लागलेली आग सकाळ 10 पर्यंत आटोक्यात आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे धान्य जळून खाक झाले आहे.