अहमदनगर - शहरासह जिल्ह्यात कोरोनाने सध्या एकीकडे धुमाकूळ घातलेला असताना रोज अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. मात्र, या मृत झालेल्या शवांची अवहेलना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कशा पद्धतीने होत आहे याची पोलखोल पुराव्यानिशी बाळासाहेब बोराटे या शिवसेना नगरसेवकाने केली आहे. एकाच शववाहिकेत एक, दोन नव्हे तर चक्क आठ पुरुष आणि चार महिला कोरोनाबाधितांचे शव अंत्यविधीसाठी नेले जात असल्याचे फोटो नगरसेवक बोराटे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या खळबळजनक आणि संतापजनक प्रकाराने अहमदनगर महानगरपालिकेचा भोंगळ आणि असंवेदनशील कारभार समोर येत आला आहे. नगरसेवक बोराटे यांनी यास मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. बोराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहले आहे. राज्यशासन पातळीवर याबाबत पाठपुरावा करू, प्रसंगी शिवसेना मनपा प्रशासना विरोधात मोठे जनआंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उपायुक्त अधिकारी नेमा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेची कर वसुलीसह अनेक कामे बंद आहेत. त्यामुळे या विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी मोकळे आहेत. या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना कोरोना संबंधी कामे द्यावीत, जेणेकरून कर्मचाऱ्यांवर वचक राहील, अशी मागणी बोराटे यांनी केली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी हे निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात मनपाकडे केवळ एकच शववाहिका आहे. त्यात वाढ करावी, अशी मागणी बोराटे यांनी केली आहे.