अहमदनगर - जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांना प्रशासकीय कामे करण्यासाठी देण्यात आलेली चार चाकी जीप वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे दरवेळी ही टोचन लावून दुरुस्तीसाठी नेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे तहसीलदारांसमोर तालुका दौरा कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात ५८ ग्रामपंचायत असून ८७ गावे आहेत. या गावांचा दौरा करण्यासाठी २०० किमी अंतरावर जावे लागते. तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे काही गावांना अचानक पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याठिकाणी कसे जायचे, हा प्रश्न तहसीलदार यांच्या समोर उभा राहिला आहे. तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने काही आपत्ती उद्भवली तर कसे जाणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत.
मागील १ वर्षापासून ही गाडी सारखी दुरुस्त करावी लागते त्यासाठी तिला प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चात नवी गाडी आली असती, अशी चर्चा तहसील कार्यालयात सुरू असते. तहसीलदारांनी गाडी बदलून देण्याची अनेक वेळा मागणी केली. मात्र, अद्याप चांगल्या स्थितीतील गाडी त्यांना मिळाली नाही. पालकमंत्री राम शिंदे हे जामखेड तालुक्यातील असून त्यांचे या भागात सतत दौरे असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत बंद गाडी घेऊन दौऱ्यात कसे जाणार, हा प्रश्न तहसीलदारांना पडला आहे.