अहमदनगर - भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी घोषित झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. सुजय विखे यांचे नाव अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जाहीर करण्यात आले आहे. डॉ. सुजय हे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र आहेत. या मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीमुळे राज्यभर चर्चा झडली आहे.
भाजपकडून आघाडीला डॉ. सुजय यांच्या रूपाने पहिले मोठे खिंडार पाडले गेले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी आज पक्षाने पहिल्या यादीत घोषित करत ही लढत विखे विरुद्ध संग्राम जगताप या २ तरुण-युवा नेत्यांत होईल हे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी भाजप पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आपण ही लढत आरामात जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. आपण विरोधी उमेदवार कोण यापेक्षा सर्वसामान्य जनतेला महत्व देत असून तीच या निवडणुकीचा अंतिम फैसला करणार असल्याने थेट जनतेत जाऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. गेले तीन वर्षापासून आपण नगर दक्षिणेतील जनतेत फिरून या मतदारसंघातील प्रश्नांचा अभ्यास केला असल्याने माझे उद्दिष्ट या मतदारसंघातील विकास असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.