अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज दुपारी शहरामधील नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अशक्तपणा आणि अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अण्णांनी गेल्या महिन्यात ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांचे जवळपास साडेचार किलो वजन घटले होते. उपोषणानंतर आज त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नगरमधील नोबेल या खासगी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या तब्येतीच्या विविध तपासण्या करण्यात येत आहेत. त्यांच्यावर किमान २ दिवस रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत समन्वयक संजय पठाडे, माजी स्वीय सहायक सुरेश पठाडे आहेत.