अहमदनगर - शहरात रविवारी (दि. 7 फेब्रुवारी) शिवतीर्थ येथे नावीन्य रूप देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डीजेच्या माध्यमातून विविध सीनेगीत लावण्यात आली होती. यावर महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेले शिवसेना व काँग्रेस पक्षाकडून टीका करण्यात येत आहे.
मूळ कारण श्रेयवाद, डीजेही कारणीभूत - एकंदरीतच रविवारी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या गर्दीत संपन्न झालेल्या या सोहळ्याची जबाबदारी, श्रेयवाद याबद्दल आता चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. 'अखंड हिंदू समाज, नगर' या नावाखाली माळीवाडा बस स्टॅण्ड समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नावीन्य रूप देण्यात आले. या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा रविवारी संध्याकाळी दिमाखात पार पडला. कार्यक्रमात मुख्य लोकार्पण राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झालेले असताना राष्ट्रीय दुखवटा असतानाही डीजेवर गाणीच्या वाजविण्यात आले. यावर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना व काँग्रेस पक्ष यांच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कडक व स्पष्ट शब्दात निशाणा साधला.
शिवसेना-काँग्रेसने 'राष्ट्रवादी'ला घेरले - यावर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तर थेट पत्रकार परिषद आयोजित करत रविवारी ज्या पद्धतीने डीजेवर गाणे लावले गेले, त्यावर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जाती-धर्माचे नसून सर्व समाजाचे आहेत, असे असताना या कार्यक्रमाला एक पक्षीय स्वरूप का देण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी राष्ट्रीय दुखवटा असताना आमदार अशा गाण्यांवर नाचतातच कसे, असे म्हणत टीका केली. मात्र, या कार्यक्रमातून शिवसेना महापौरांना दूर ठेवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात केवळ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जंगताप व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच होते. ही जिल्ह्यातील शिवप्रेमींची फसवणूक असल्याचा घणाघात विक्रम राठोड यांनी केला.
गाण्यांवर काही हिंदुत्ववादी संघटना नाराज - दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना असलेल्या श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानने या कार्यक्रमातील एकंदरीत प्रकारावर आक्षेत घेत टीका केली आहे. डीजे आणि तरुणांचे समीकरण नजरेसमोर ठेवूनच अशी गाणी लावली गेली, असे म्हणत समाजप्रबोधनाचे कार्यक्रम ठेवले असते तर बरे झाले असते, अशा शब्दात श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहराध्यक्ष बापूसाहेब ठाणगे यांनी टीका केली.
श्रेयवाद आणि स्थानिक राजकारणाने घेतली उसळी - एकंदरीत सोमवारी (दि. 7 फेब्रुवारी) दिवसभर या घडामोडी होत असताना त्यावर बोलण्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचबरोबर राज्यात आघाडीत एकत्र असलेल्या या तीन पक्षातील सुंदोपसुंदी सुरू असताना विरोधात असलेला भाजप पक्ष मात्र यावर पूर्णपणे चुप्पी साधून आहे. भाजपच्या वतीने कोणीही यावर अधिकृत स्वतःहून प्रतिक्रिया दिलेली नाही. शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांना संपर्क केला असता आपण सध्या सहकुटुंब बाहेरगावी असून आपल्याला या एकूण कार्यक्रमाबद्दल कसलीही कल्पना नसल्याने काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे सांगितले. एकूणच पाहता शनिवारी लोकार्पण सोहळा उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडला असला तरीही त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर येत असलेले विविध कंगोरे आणि त्यावरून होणारी टीका हा सध्या शहरात मोठा चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा - Anna Hazare On Lata Mangeshkar : भारताचे वैभव हरपले, अण्णा हजारे यांनी दिला लतादीदींच्या आठवणींना उजाळा