अहमदनगर - पावसाने यावर्षी राज्यभर धुमाकूळ घातला. झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि पशुपालन करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात शेळीपालन आणि मेंढीपालन करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. सततच्या पावसाने मेंढ्यांना विषाणुजन्य आजारांची लागण झाली आहे.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, खारेवाडी, कोकणेवाडा या दुर्गमगावांत मेंढ्यांचे संगोपन करणारा धनगर समाज वास्तव्यास आहे. हा मेंढपाळ समाज मोठ्या आर्थिक संकटात आहे. मेंढ्यांच्या खुरांना विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. यामुळे शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
लांबलेला परतीचा पाऊस, ओलसर चारा आणि चिखलमय निवारा या नैसर्गिक परस्थितीमुळे मेंढ्यांच्या खुरांना विषाणूजन्य आजारांची लागण झाली. या आजाराची लागण झाल्यानंतर मेंढ्यांच्या खुरांना जखम होऊन मेंढ्या जागेवरच बसून राहतात. त्यांचे अन्नपाणी घेण्याचे प्रमाण हळूहळू कमी होते आणि कालांतराने त्यांचा मृत्यू होतो.
हेही वाचा - पाच वर्ष मागे गेलेल्या राज्याला पुढे आणण्यासाठी काम करायचे आहे - रोहित पवार
स्थानिक पुढारी, जिल्हा परिषदचे वैद्यकीय अधिकारी आणि पारनेर तहसील कार्यालयाला याबाबतची माहिती समजल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, पशु वैद्यकीय अधिकारी डी.एस.राठोड यांनी गावांना भेट दिली. अधिकाऱयांच्या पाहणी दौऱयावेळी मेंढपाळ बांधवांनी आपली व्यथा मांडली.
हेही वाचा - शेतकऱ्यांना हमीभावासह संपूर्ण कर्जमाफी मिळावी; माकपच्या आमदाराची अपेक्षा
एका मेंढीची किंमत सरासरी दहा हजार रुपये आहे. मात्र, शासन नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून शवविच्छेदन झालेल्या एका मेंढीचे तीन हजार रुपये देत आहे. ही मदत वाढवून मिळावी अशी मागणी आर्थिक संकटात सापडलेल्या धनगर बांधवांची आहे. नुकसानीचे पंचनामे करून शासन नियमानुसार मदत दिली जाईल, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.