शिर्डी - संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींची अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासे ही कर्मभूमी आहे. येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर व प्रांगणात सोमवारी सायंकाळी ७२४ दीप प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर व परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता.
हेही वाचा - राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या - संजय राऊत
माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर मंदिरातील 'पैस'खांबाचे विधीवत पूजन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ह.भ.प शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनिलगिरी महाराज, उद्धव महाराज, जयश्री गडाख, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले, कैलास जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, अंबादास इरले, नंदकुमार महाराज खरात, जेष्ठ पत्रकार मधुकर देशपांडे, अशोक डहाळे खरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माऊलींच्या पैस खांबाजवळ पहिला दीप प्रज्वलीत करून संजीवन सोहळा प्रारंभ करण्यात आला. तद्नंतर ओम आकृतीच्या तयार केलेल्या प्रतिकृतीवर दीप ठेवण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर भाविकांनी दीप प्रज्वलित केले. यावेळी दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर व परिसर उजळून निघाला होता. यावेळी झालेल्या नमो ज्ञानेश्वरा भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला.