अहमदनगर - येथील अहमदनगर- कल्याण-त्रिवेंद्रम या राष्ट्रीय महामार्गावर नगर जिल्हा हद्दीत टाकळी ढोकेश्वर येथील टोल नाक्यावर स्थानिक ग्रामस्थांकडून सक्तीने टोल वसुल केला जात आहे. याचा निषेध म्हणून परिसरातील ग्रामस्थांनी आज पाच ते सहा तास आंदोलन करत टोल नाका बंद पाडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स काढलेला नाही, पुरेसे कर्मचारी नाहीत. कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड नाही, अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. तरीही नियमांची पूर्तता न करता बेकायदेशीर टोल वसुली होत असल्याचे सांगत, झावरेंनी टोल प्रशासनाला धारेवर धरले.

मात्र, स्थानिकांना नियमानुसार सवलत न देता सक्तीने त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलन बराच काळ सुरू असल्याने यामार्गावरून प्रवास करणारी वाहने खोळंबून होती. येत्या पंधरा दिवसात सर्व त्रुटी सुधारण्यात येतील, असे यावेळी टोल व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.