अहमदनगर- जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण जामखेड शहरात आढळले आहेत. आतापर्यंत येथून 17 रुग्ण समोर आल्याने जामखेड कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सहा मेपर्यंत शहर पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या परस्थितीचा आमदार रोहित पवार यांनी आढावा घेतला.
जिल्ह्यात सर्वात जास्त संशयितांच्या स्त्राव चाचण्या घेतल्याने रुग्ण शोधण्यात मदत झाली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. जामखेडमध्ये दोन विदेशी रुग्णांसह सतरा कोरोनाबाधित होते. त्यापैकी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या अकरा रुग्णांवर नगरमध्ये उपचार सुरू असून यातील बहुतेक रुग्ण हे मृत झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून जामखेडमधून नव्याने रुग्ण आढळून आलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. त्या अनुषंगाने पोलीस-आरोग्य आणि महसूल प्रशासन सर्वोतोपरी यंत्रणा राबवत आहे. जामखेडमध्ये विविध विभागाच्या झालेल्या समनव्य बैठकीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे उपस्थित होते.