अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेमदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर येथे शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने भाऊसाहेब कांबळे व शिवसेनेच्यावतीने खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री यांची २६ तारखेला श्रीरामपुरात सभा घेण्यात येणार आहे.
भाजप आणि शिवसेनेने प्रचाराचा धडाका सुरू केल्याने महाआघाडीकडून प्रचाराची रचना आखली जात आहे. याच व्युहरचनेसाठी राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.